बुलडाणा जिल्ह्यात ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे खुली होणार

बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ७ ऑक्टोंबरपासून कोरोना संसर्गाचे नियम पाळून खुली केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी काढले आहे.

धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात. अशा ठिकाणी अथवा ठिकाणांच्या आवारात कोविड 19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. कंटेन्टमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. केवळ कंन्टेटमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरू करण्यास परवानगी असणार आहे. धार्मिक स्थळी 65 वर्षावरील नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच रहावे. धार्मिक अथवा प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सामान्य प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांनी करावे. सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरीक अंतर राखणे आवश्यक राहणार आहे. मास्क किंवा स्वच्छ रूमाल यांचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावे किंवा अल्कोहोलयुक्त सॅनीटायझरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. यचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

या उपाययोजनांचा अवलंब करावा
प्रवेशद्वारावर सॅनीटायझर डिस्पेंसर, थर्मल स्क्रीनींगची सोय असावी, कोविड लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, मास्क लावलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना पोस्टर्सच्या माध्यमातून दर्शनी भागात लावाव्यात. तसेच ऑडीओ व व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रसरीत कराव्यात, वाहन पार्किंगच्या ठिकाणी तसेच परीसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे, धार्मिक ठिकाणच्या परीसरात बाहेरील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटरीया या ठिकाणी पुर्णवेळ सामाजिक अंतराचे आणि संबंधीत मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, धार्मिक स्थळांच्या परीसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी विशिष्ट मार्किंग करावे, पुतळे, मुर्ती, पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्याची परवानगी नसावी, एकमेकांना अभिवादन करताना शारिरीक संपर्क टाळावा, प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे आदीसारख्या शारीरिक अर्पणांना परवानगी असणार नाही. धार्मिक ठिकाणी प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गांची स्वतंत्र व्यवस्था असावी, या ठिकाणी भाविकांना बसण्याची व्यवस्था करताना योग्य सामाजिक अंतराचे पालन करावे, वातानुकूल यंत्र अथवा वायुविजनसाठी सीपीडब्ल्यूडी च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात यावे. वातानुकूलीत यंत्रणांचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सीअस पर्यंत राखले जाईल. तसेच सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्के पर्यंत असावी, धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई अथवा जमखाना वापर करण्यास परवानगी असणार नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा, जो प्रार्थनेनंतर परत घेवून जावा, धार्मिक स्थळी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा असून आठवड्यातून एकदा कोविड चाचणी करणे आवश्यक आहे, खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रीत करावी.

संशयीत रूग्ण आढळल्यास ही कारवाई करावी
आजारी व्यक्तीला इतरांपासून दूर ठेवावे, डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क वापरावा, तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात कळवून स्थानिक प्रशासनास कळवावे, नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे सदर रूग्णाबाबत जोखीम मूल्यांकन केले जाईल. त्यानुसार रूग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत कार्यवाही करावी. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचेविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

Protected Content