चाळीसगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांना बी बियाणे व खतांची टंचाई भासू नये, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पंचायत समितीच्या कृषी विभागाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
तालुक्यातील खरीप पिकांसाठी शेतातील मशागतीला वेग आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून युरियाच्या टंचाई संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून नवीन रॅक मागवून युरियाचा मुबलक साठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अश्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना फोनवरून दिल्या. युरियाचा ऑनलाइन व प्रत्यक्षात असलेला साठा याबाबत देखील आमदार चव्हाण यांनी माहिती जाणून घेत याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
तसेच तालुक्यात बी-बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करून जे कुणी कृषीकेंद्र चालक जबरदस्ती युरीया सोबत इतर खते खरेदी करायला सांगत असतील किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करत असतील त्यांच्यावर ट्रॅप टाकून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे बियाणे व रासायनिक खते उपलब्ध झाली पाहिजेत अश्या सूचना आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जि.प. सदस्य पोपटतात्या भोळे, पं.स. गटनेते संजय पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम.एस. भालेराव साहेब आदी उपस्थित होते.