बीड (वृत्तसंस्था) कोरोनाला घाबरुन एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे घडला आहे. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे.’ , अशी सुसाईड नोट लिहून आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) या वृद्धाने आत्महत्या केली आहे.
आसाराम पोटे यांना कुठलाही आजार नव्हता. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांत कुठेही प्रवास केलेला नव्हता. एवढेचं काय तर ते कोणत्याही नवीन व्यक्तीच्या संपर्कातही आले नव्हते. केवळ कोरोनाविषयी बाहेर चर्चा ऐकून आणि सद्य परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आसाराम यांनी ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही’, असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.