बीएसडब्ल्यूसह कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने बी.ए., बी.कॉम, बीएस्सी प्रथम वर्ष आणि बी.एस.डब्ल्यूचा निकाल जाहीर केला आहे. यातील सत्र दोनचा निकाल परीक्षा न घेता प्रवेशीत सत्रातील ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन व ५० टक्के लगतच्या पूर्वीच्या सत्रातील परीक्षांच्या गुणांच्या आधारे जाहीर झाला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू झाली.अशा परिस्थितीत राज्य शासनाने परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित केली होती.या समितीच्या अहवालामध्ये करण्यात आलेल्या शिफारसीनुसार विद्यापीठाने कार्यवाही सुरू केली. विद्यापीठाने ११ जून रोजी या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची पद्धत जाहीर केली होती. या परिपत्रकातील सुत्राप्रमाणे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे हे निकाल जाहीर करण्यात आले आहे.अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली.

प्रथम वर्ष बीए प्रथम वर्ष १२ हजार २७३, प्रथम वर्ष बी.कॉमचे ५ हजार १५१, प्रथम वर्ष बी.एस्सीचे ८ हजार ८५९ आणि बी.एस डब्ल्यू प्रथम वर्षाच्या २०७ व द्वितीय वर्षाच्या १८७ विद्यार्थ्यांचे निकाल संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले आहे.हे सर्व विद्यार्थी सीबीसीएस पॅटर्न मधील आहेत. काही विद्यार्थी अनुत्तीर्ण असले तरी पुढील वर्गात ते प्रवेशास पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये/श्रेणीमध्ये सुधारणा करायची असेल त्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षात घेतली जाणार असल्याचे संचालक बी.पी पाटील यांनी सांगितले .

Protected Content