बिहार निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी , शिवसेना एकत्र ?

 

मुंबई : वृत्तसंस्था । शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तासभर या बैठकीत मराठा, धनगर , ओबीसी आरक्षणाविषयी चर्चा झाली. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी संयुक्त प्रचार करायचा का, याबाबतही खल झाल्याचे समजते.

प्रामुख्याने बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी निवडणुकीत संयुक्त प्रचार केला तर त्याचा नेमका कितपत फायदा होईल यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.

दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू केल्या आहेत. आरक्षणाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, ती लढाईही राज्य सरकार लढत आहे. हे आरक्षण कायम राखण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी याआधीच जाहीर केले आहे. या बैठकीत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मराठा आरक्षणाबरोबरच धनगर तसेच ओबीसी आरक्षणाचाही विषय चर्चेला आला. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत करण्याच्या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जात असून, त्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या तसेच अन्य मागण्यांबाबत कोणती सकारात्मक पावले उचलली जायला हवीत यावरही बरीच चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा यावेळी चर्चिला गेला.

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत संयुक्त प्रचार केला तर आनंदच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. आपण बिहारमध्ये प्रचाराला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content