फडणवीसांची ७० टीएमसी पाण्याची घोषणा फसवीच

 

सांगली: वृत्तसंस्था । ‘जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात जादा ७० टीएमसी पाणी साठल्याची फसवी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण तसे काही झालेच नाही.उलट निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने पाणी वाहून गेले.चौकशी करून दोषींवर कारवाई होणारच,’ असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून राज्य सरकार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवरून थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘ ७० टीएमसी पाणी म्हणजे वारणा धरणाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी. ७० टीएमसी जादा पाणी साठवता आले असते तर, दुष्काळी भागाला त्याचा फायदा झाला असता. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झालेले नाही.

जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामांची राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे. नेमक्या कोणत्या कामांची चौकशी करायची हे ठरवण्यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात चार वर्षांत झालेल्या १७ हजार कामांची चौकशी सुरू झाली आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १४१ गावात ४ हजार ७२९ कामे झाली. २०१७-१८ मध्ये १४० गावात ७ हजार ९५१ कामांपैकी ७ हजार ४३८ कामे पूर्ण झाली आहेत. २०१८-१९ मध्ये ८ तालुक्यांतील ४०३ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. जिल्ह्यात मागील चार वर्षात ४२१ गावांत १७ हजार ३३६ कामे झाली. यासाठी १७७ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यातील अनेक कामांबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. कामातील अनियमितता, अपूर्ण कामाचे पैसे उचलणे, निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत.

Protected Content