नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना . कोरोना गाईडलाईन्सचं पालन करत परत जाण्याचं आवाहन केलं. यावेळी, ‘बिहार निवडणुकीवेळी करोना गाईडलाईन्स कुठे गेल्या होत्या?’ असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी पोलिसांची आणि प्रशासनाची बोलतीच बंद केली.
पोलीस आणि शेतकऱ्यांची चर्चा फिस्कटली. दिल्लीत दाखल होण्यावर शेतकरी ठाम आहेत. ते पोलिसांचं काहीही ऐकण्यास तयार नाहीत. सिंघु सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
‘आम्ही शांततेच्या मार्गानं आमचं आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन असंच सुरू राहील. शांतीपूर्ण मार्गानंच आम्ही दिल्लीत प्रवेश करू. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाची परवानगी असायला हवी’, असं आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटलंय.
शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, आज सायंकाळपर्यंत ५० हजारांहून अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर उभे असतील.
स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनाही पोलिसांकडून गुरुग्रामच्या विलासपूर भागात ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यासोबत आणखीन ५० हून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केलीय. यावेळी, ‘शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला जात आहे. या देशात शेतकरी असणं गुन्हा आहे का?’ असं विचारतानाच ‘मला सांगण्यात येतंय की मी कोरोना महामारीच्या नियमांचं उल्लंघन करत आहे. परंतु, रविवारी मेवातमध्ये हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांची रॅली आयोजित करण्यात आली होती तेव्हा कोरोना नव्हता का?’ असा प्रश्नही योगेंद्र यादव यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला होता.
दरम्यान, काही पंजाब आंदोलकांचा एक गट बहादूरगडला दाखल झालाय. दिल्लीच्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रोड बंद करण्यात आल्यानं दिल्लीतून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फटका बसतोय.
दिल्लीत दाखल होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी सरकारकडे ९ स्टेडियमला तुरुंगात परिवर्तीत करण्याची परवानगी मागितल्याचं समजतंय.