बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

.

पाटणाः वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपला. पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ मंत्र्यांच्या विश्वासार्हतेसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यापैकी ४ भाजप आणि जेडीयू कोट्यातील ४ मंत्री आहेत. विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. अनेक जागांवर बंडखोर सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान बनले आहेत. अशा परिस्थितीत नितीशकुमारांच्या मंत्र्यांच्या जागांवर चुरशीची लढाई दिसणार आहे.

नितीशकुमार सरकारमधील ज्या ८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यात कृषिमंत्री डॉ. प्रेम कुमार, शिक्षणमंत्री कृष्णा नंदन वर्मा, ग्रामविकास मंत्री शैलेश कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जय कुमार सिंह यांचा समावेश आहे. परिवहन मंत्री संतोषकुमार निराला, महसूलमंत्री रामनारायण मंडळ, कामगारमंत्री विजय कुमार सिन्हा आणि एससी व एसटी कल्याण मंत्री ब्रिजकिशोर बिंद यांचा समावेश आहे.

जेडीयू-भाजप युतीला राष्ट्रीय जनता दलाचे आव्हान आहे. या निवडणुकीत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव सतत महागाई, बेरोजगारी आणि बिकट अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

कांद्याच्या वाढत्या दराचा निषेध करत तेजस्वी यादव यांनी माध्यमांसमोर कांद्याची माळ आणली होती. ‘महागाई हा सर्वात मोठा मुद्दा आहे. छोटे व्यापारी नष्ट होत आहेत. दारिद्र्य वाढत आहे. जीडीपी कमी होत आहे. आपण आर्थिक संकटातून जात आहोत, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

Protected Content