बिहारमध्ये राष्ट्रवादीशी काँग्रेसचे बिनसले

मुंबई: वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलासोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती. आम्ही जास्त जागांसाठी आग्रहीदेखील नव्हतो पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही. त्यामुळे आता स्वबळावर ही निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रफुल पटेल यांनी नमूद केले.

बिहारमध्ये एकत्र येऊन भाजप व जदयूचा मुकाबला केला पाहिजे, असे एकीकडे म्हणतात मात्र दुसरीकडे इतर पक्षांना महत्त्व देत नाहीत, ही काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असल्याची खंतही पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.

बिहारमध्ये आम्ही या निवडणुकीत महाआघाडीचा भाग नसणार आहोत. आम्हाला या आघाडीत स्थान दिले गेले नसल्याने आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, असे नमूद करताना पटेल यांनी शिवसेनेबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. बिहारमध्ये एकत्र लढण्याबाबत शिवसेनेसोबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले. पक्षाने बिहारमध्ये स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यात बिहारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीने संयुक्तपणे प्रचार करावा का, त्याचा कितपत फायदा होईल, यावर खल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोरच राष्ट्रवादीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत संयुक्त प्रचार केला तर आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली होती. या सर्वावर कोणतंही भाष्य पटेल यांनी केले नाही. मात्र सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून जो वाद निर्माण झाला होता ते लक्षात घेता महाराष्ट्र सरकारमधील दोन पक्षांची बिहारच्या निवडणुकीतील एंट्री लक्ष्यवेधी ठरलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना तिथे किती पाठबळ मिळणार हा प्रश्नच असला तरी दोन्ही पक्ष चर्चेत मात्र नक्कीच राहणार आहेत.

Protected Content