मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील मोदी सरकारने घेतलेल्या यु-टर्नवरुन निशाणा साधला आहे. “नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार?,” अशी विचारणाच त्यांनी केली आहे.
लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अर्थ मंत्रालयाकडून तात्काळ तो मागेदेखील घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं स्पष्ट केलं आहे. निर्मला सीतारमन यांनी केलेल्या ट्विटनंतर मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेल्या पाच वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. घोडचुका कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?”.