बायडेन यांच्याकडे जगाचेही लक्ष

 

वॉशिंग्टन/लंडन: वृत्तसंस्था । डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेसाठी भल्या ठरणाऱ्या निर्णयांच्या अंमलबजावणीकडे प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, यामुळे जगाचे पालकत्व स्वीकारलेल्या अमेरिकेचा आधार गमावण्याच्या अवस्थेपर्यंत जग पोहोचले होते. बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याने आता जग पुन्हा अमेरिकेकडे आशेने पाहात आहे.

खूप धोरणे प्रलंबित आहेत. आता व्हाइट हाऊससोबत काम करणे अधिक सोपे होईल, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे’, या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रतिक्रियेतूनच अमेरिकेचे दरवाजे बाह्यजगासाठी ट्रम्प यांनी कसे बंद केले होते, याचा अंदाज बांधता येतो. ‘संपर्क हा मुख्य फरक असेल. सहकारी, मित्र देशांना सन्मानाने वागवण्याचे पर्व सुरू होईल’, अशी आशा जर्मनीचे संसद सदस्य पीटर बायर व्यक्त करतात. मित्र व शत्रूंप्रति ट्रम्प यांचा व्यवहार एकसमानच होता, असा अनुभव जागतिक नेत्यांनी वारंवार घेतला. आता त्यामध्ये बदल होईल, अशी त्यांना आशा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर व नर्स यांच्या म्हणण्यानुसार सर्व देशांनी एकत्र येऊन काम केल्यास कोरोना लवकर नियंत्रणात येऊ शकतो. पण, हे ट्रम्प यांच्या कार्यकाळात कधीच घडले नाही. संघटनेतून बाहेर पडणे हे शास्त्रीय सल्ला न जुमानण्याच्या धारणेतूनच घेतलेला निर्णय होता. संघटनेच्या मुख्य संशोधक सौम्या स्वामिनाथन म्हणतात, ‘कोरोनाबाबत प्रत्येक देशाचा स्वतंत्र नव्हे, वैश्विक दृष्टिकोन हवा. अमेरिका पुन्हा लशीच्या वितरणाच्या संघटनेच्या मोहिमेत सहभागी होईल, अशी आशा आहे.’

हवामान करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा बायडेन यांनी केल्याने दक्षिण आशियातील देश आशावादी आहेत. पर्यावरण बदलाचा मोठा फटका या प्रदेशातील देशांना पुराच्या वाढत्या घटनांमुळे अधिक बसत आहे. मोठी शहरे वारंवार पाण्याखाली जात आहेत. उन्हाळ्याचा काळ वाढत आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. ‘अमेरिका जगाचे नेतृत्व आहे. अमेरिकेने पुन्हा एक पाऊल पुढे टाकल्यास संपूर्ण जग त्याचे अनुकरण करील’, असे हवामान कराराबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

चीन, रशियाच्या विस्तारवादी कारवायांना अमेरिका शक्तिनिशी प्रत्युत्तर देईल, दक्षिण कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमास प्रतिबंध करील, अशी अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांची अपेक्षा आहे. याशिवाय युरोपातील देशांना अमेरिका पुन्हा ‘नाटो’सोबत सहकार्य वाढवण्याची आशा आहे.

Protected Content