बँक कर्मचाऱ्यांना लवकरच ‘परफॉर्मन्स-लिंक्ड पे’चा लाभ मिळणार !

bank office

कोलकाता, वृत्तसंस्था | सरकारी बँकांमधील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना पुढील आर्थिक वर्षापासून सरकारी बँक कर्मचाऱ्यांना वेतनासह परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) मिळण्याची शक्यता आहे. याआधी बँक व्यवस्थापनांनी ‘व्हेरिएबल पे’ किंवा ‘परफॉर्मन्स-लिंक्ड पे’चा प्रस्ताव दिला होता. खासगी क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांना ‘व्हेरिएबल पे’ आधीपासूनच दिला जात आहे

 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पीएलआय देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे सर्व सरकारी बँकांमधील संरचनेत सुसूत्रता येईल. त्याची पद्धत अद्याप निश्चित व्हायची आहे, अशी माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष राजन नागर यांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन बँक असोसिएशनच्या समितीने गेल्या आठवड्यात ‘परफॉर्मन्स लिंक्ड पे’बाबत प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बँकांचे वार्षिक अहवाल जाहीर झाल्यानंतर पीएलआय देण्यात येईल, अशी शक्यता आहे. सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर द्विपक्षीय समझोता दर पाच वर्षांनी होतो. वेतनवाढीच्या ११ व्या समझोत्यावर सध्या चर्चा सुरू आहे.

‘परफॉर्मन्स लिंक्ड पे’च्या मुद्द्यावरील भूमिकेत बदल झाला आहे. पीएलआय वेतनामध्ये समाविष्ट केला जाणार नाही, असे इंडियन बँक असोसिएशनने स्पष्ट केले आहे. ते वेतनवाढीच्या व्यतिरिक्त दिले जाणार आहे. इंडियन बँक असोसिएशनने वेतनात १२ टक्क्यांच्या वाढीची मागणी केली आहे. तर किमान १५ टक्के वाढीच्या मागणीवर बँक संघटना ठाम आहेत, अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशनचे (एआयबीओसी) महासचिव सौम्य दत्ता यांनी दिली आहे.

Protected Content