जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या कडधान्यावरील स्टॉक लिमिट लावण्याच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमालाशी संबंधित सर्व व्यवहार शुक्रवारी दिवसभर बंद होते. त्यामुळे व्यापार्यांचे बंद आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले, अशी माहिती जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी दिली.
या बंदमुळे जिल्ह्यातील 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज व्यापार्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने डाळींवर पुन्हा स्टॉक मर्यादा लावल्यामुळे व आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने धान्याच्या व्यापार्यांमध्ये तीव्र नारीजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने 2 जुलै रोजी परिपत्रक काढून डाळींच्या साठवणुकीवर तत्काळ स्टॉक मर्यादा लागू करण्याची घोषणा केली. व्यापार्यांनी या धोरणाविषयी केंद्र सरकारचा निषेध केला.
केंद्र सरकारने कडधान्य स्टॉक लिमिटचे धोरण मागे घ्यावे, खुल्या आयातीला दिलेली परवानगी रद्द करावी, तेलबियांच्या भावाबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी असोसिएशनचे उपाध्यक्ष कल्पेश संघवी (पाचोरा), ईश्वर कोठारी (जामनेर), मधुकर येवले (चाळीसगाव), सचिव यतीन कोठारी (अमळनेर), सहसचिव नरेंद्र लढ्ढा (भुसावळ), जितेंद्र बोथरा (चोपडा), अतुल अग्रवाल (रावेर), हितेश नेमाडे (सावदा), राहुल गुजराथी (फैजपूर), अशोक चौधरी (यावल), भरत शेंडे (पाचोरा), अल्केश ललवाणी (जामनेर), विशाल करवा (धरणगाव), संदीप जाखेटे (एरंडोल), माणकचंद अग्रवाल (बोदवड), दिलीप मंत्री (कासोदा) यांनी केली आहे.