भोपाळ । मध्यप्रदेश विधानसभेच्या सभापतींनी बंडखोर काँग्रेस आमदारांचे राजीनामे स्वीकारल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले असून ते बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा देण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला शुक्रवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी काल रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले. त्यामुळे आधीच अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक काही मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्याविरोधात भूमिका घेत आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते. तथापि, काल रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले असून कमलनाथ सरकारसमोरील अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांचे सरकार हे स्पष्टपणे अल्पमतात आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, आज बहुमत चाचणीच्या आधीच कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यात ते आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात.