बस रिव्हर्स घेतांना धक्का लागल्याने अधिकार्‍याचा मृत्यू; एसटी वर्कशॉपमधील दुर्घटना

जळगाव प्रतिनिधी । येथील एसटी वर्कशॉपमध्ये आज सकाळी दुरूस्त झालेली बस रिव्हर्स घेतांना धक्का लागून वर्कशॉप चार्जमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील नेरी नाका स्मशानभूमिच्या पुढे असलेल्या एसटी वर्कशॉपमध्ये आज सकाळी अपघात घडला. वर्कशॉप चार्जमन म्हणून कार्यरत असणारे भीकन शंकर लिंडायत (वय ५७, एसटी कॉलनी) हे दुरूस्त झालेल्या एका एसटीच्या वाहकाला हात मागे करून दिशानिर्देश देत होते. यातच मागे एक बस उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तर समोरच्या वाहकाने गाडी जोरात रिव्हर्स घेतल्याने त्यांना धक्का लागला. आणि ते दोन्ही बसच्या मध्ये दबले गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या काही क्षणांमध्ये झालेल्या या अपघातामुळे एसटी वर्कशॉपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एसटी वर्कशॉपमधील सुरक्षेचा मुद्दा आधी देखील अनेकदा चव्हाट्यावर आला होता. मात्र यात काहीही उपाययोजना न करण्यात आल्याने आज एका अधिकार्‍याला जीव गमवावा लागल्याची संतप्त भावना कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भीकन शंकर लिंडायत हे गेल्या दहा दिवसांपासून सुटीवर होते. आजच ते ड्युटीवर रूजू झाले असतांना त्यांना मृत्यूने गाठले. यंदा ३१ डिसेंबरला ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्येने एसटी कॉलनीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content