जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठेतील राजा सेल्स हे फुटवेअर होलसेलचे दुकान चोरट्यांनी रविवार २१ मार्च रोजी मध्यरात्री २.२० वाजता फोडून दुकानातील २४ हजार रूपयांची रोकड लांबविली. या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चार चोरटे कैद झाले आहेत. शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार शंकरलाल नाथाणी (रा. जयनगर) यांच्या मालकीचे हे दुकान आहे. रविवारी २१ मार्च रोजी त्यांनी दुकान बंद होते. मध्यरात्री २.२० वाजता चेहरा पुर्णपणे झाकलेल्या अवस्थेत चार चोरटे त्यांच्या दुकानाबाहेर आले. या चोरट्यांनी शेजारी रेल्वेरुळावरुन रेल्वे जात असतानाच्या आवाजाचा फायदा घेत लोखंडी टॉमीने दुकाने तीन कुलूप तोडून आत प्रवेश केला. एक चोरटा लक्ष ठेवण्यासाठी बाहेर उभा राहिला तर तीघांनी आत जाऊन सामान अस्ताव्यस्त करीत छाणणी केली. आतील एक गल्ला तोडून त्यात ठेवलेली २४ हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. पळुन जात असताना त्यांनी पुन्हा अंधाराचा फायदा घेत रेल्वेरुळाकडे धाव घेतली. आज २२ मार्च रोजी सकाळी सकाळी नाथाणी हे दुकानात आले तेंव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचे डिव्हीआर मशीन तपासले असता चार चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले. यानंतर नाथाणी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.