जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
स्थापन कक्षाचा दुरध्वनी क्र. 0257-2958200/ 2262808 असा आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील यांनी दिली. जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या 30 टिम स्थापन करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करील आहे. पक्षी मालकांनी आपल्या कुक्कुट पक्षाचा स्थलांतरीत पक्षाशी संपर्क टाळावा. कुक्कुट पक्षात असाधारण मरतूक आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
पूर्ण शिजवलेले चिकन व उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु आजार पक्षांपासून थेट माणसांना होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे बर्ड फ्ल्युबाबत नागरीकांनी भिती बाळगू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी केले आहे. आपात परिस्थितीसाठी लागणारे पी. पी. ई किट, सॅनिटाईझर, मास्क, ग्लोज आदि साहित्य जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात कुठलीही आपात परिस्थिती हाताळण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.