जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांनी बकरी र्ईद निमित्तची नमाज ही मस्जिद, ईदगाह तसेच सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, आपल्या घरीच अदा करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले.
बकरी ईद सणानिमित्त जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षका भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक व मुस्लिम समाल बांधव उपस्थित होते. सध्या कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नमाज न अदा करता घरी नमाज अदा करावी व सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले.
बकरी ईद सणानिमित्त नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून किंवा एकत्र जमू नये, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार येणार नसल्याचेही माहिती देण्यात आली. यावेळी बैठकीत मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती.