अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील अल्हाद नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ३० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवार २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल बारकू पाटील (वय-38, रा, अल्हाद नगर, अमळनेर) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्याचे मूळ गाव अंजदे बुद्रुक येथील असल्याने तरूण हा गावाला गेल्यामुळे त्याचे घर १८ एप्रिल पासून बंद होते. दरम्यान घर बंद असल्याच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ३० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांचे घर उघडे असल्याचे लक्षात येताच त्यांचे शेजारी राहणारे योगेश तुकाराम माळी यांनी फोन करून विठ्ठल पाटील यांना घर उघडे असल्याचे सांगितले. त्यानुसार विठ्ठल पाटील हे घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.