पुणे : वृत्तसंस्था । जात पंचायत भरण्यावर कायदेशीर बंदी असतानाही पुरंदर तालुक्यातील गराडे येथे भातु समाजाची जातपंचायत भरून एका महिलेला तिच्या कुटुंबियासह बहिष्कृत केल्याचा प्रकार घडला.
पाच बोकड,पाच दारूच्या बाटल्या,एक लाख रुपये हा दंड भरला तरच पुन्हा जातपंचायती मध्ये घेतले जाईल असे पंचांनी जाहीर केले.यानंतर या महिलेने धनकवडी (पुणे) पोलिस ठाण्यात धाव घेतली फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.
गुरुवारी गराडे येथील राजलीला मंगल कार्यालयामध्ये जात पंचायत भरवण्याचा प्रकार घडला आहे. महिलेने वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मागितला होता.त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी बेकायदेशीरपणे जात पंचायत भरवण्यात आली.
यावेळी उपस्थित सहा जणांनी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलीचा काहीच अधिकार नाही असा निवाडा केला व त्या महिलेसह कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले.परत जातीत यायचे असेल तर पाच बोकड,पाच दारूच्या बाटल्या व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी गंभीर दखल घेऊन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.स्वतःचे कायदे अमलात आणून भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याबद्दल व सामाजिक बहिष्कार यापासून व व्यक्तिचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलमानुसार आरोपी सुरेश रतन बिनावत (वय ६५ नगर हडपसर) नंदू आत्राम रजपूत (वय ५५ इंद्रप्रस्थ बंगला वारजे,पुणे) संपत पन्नालाल बिनावत ( वय ५६ रा सातव नगर हडपसर,पुणे) आनंदा रामचंद्र बिनावत ( वय ५० सातव नगर हडपसर,पुणे) देविदास राजू चव्हाण (वय ५२ नरे गाव पुणे) देवानंद राजू कुंभार ( वय ५१ धनकवडी पुणे ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जेजुरी येथे पूर्वी पौष पौर्णिमा यात्रेच्या वेळी बंगाली पटांगणामध्ये अशा प्रकारच्या वैदू व भातु कोल्हाटी समाजाच्या जातपंचायती भरत होत्या परंतु शासनाने अशा बेकायदेशीर जातपंचायती वर बंदी घातल्याने या जात पंचायती कालबाह्य झाल्या आहेत.