मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना महामारीच्या या काळात पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, अग्निशमन दल कोरोनाशी लढत आहेत. हे सगळेच आपल्यासाठी माणसाच्या रुपातील देवदूतच आहेत. यांच्याबरोबरच एक वर्ग असा आहे जो शांतपणे जनतेची सेवा करत आहे. तो म्हणजे बँकेचा कर्मचारी वर्ग. या कोरोना योद्ध्यांनादेखील सरकारने इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई यांनी सरकारकडे केली आहे.
नितीन सरदेसाई यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेय की, लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांचे सगळेच व्यवहार ठप्प झाले. अशा परिस्थितीतही जनतेला पैशांची चणचण भासू नये म्हणून बँकांचे व्यवहार मात्र अव्याहतपणे सुरु आहेत. लोकांचे पगार खात्यात जमा करणे, सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जारी केलेले आदेश अथवा नियम अंमलात आणणे, लोकांचे इतर आर्थिक व्यवहार सुरु ठेवणे ही सगळी कामे बँक कर्मचारी करीतच आहेत. प्रवासाची सुविधा नसतानाही बँकेचे कर्मचारी कामावर येत आहेत. दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तसेच नोटा हाताळण्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा धोका आहे. पण हा धोका पत्करुन हे ‘कोरोना योद्धे’ आपली कर्तव्य चोख पार पाडत आहेत. या कोरोना योद्ध्यांनादेखील सरकारने इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी नितीन सरदेसाई यांनी सरकारकडे केली आहे.