नवी दिल्ली – वृत्तसंस्था । अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील थिंक टँकने भारताच्या फ्रीडम स्कोअरला डाऊनग्रेड म्हणजेच कमी केलं आहे. ‘फ्रीडम हाऊस’चा अहवाल हा भारतविरोधी कटाचाच भाग असल्याचा दावा भाजपा खासदार प्रा. राकेश सिन्हा यांनी केला आहे.
फ्रीडम हाऊसच्या या क्रमवारीत यापूर्वी भारत हा ‘मुक्त ‘ या श्रेणीतील देशांमध्ये होता. परंतु आता भारताच्या क्रमवारीत घसरण झाली असून भारताला आता
‘ अंशतः मुक्त ‘ या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. नव्या आकडेवारीत भारताच स्कोअर ७१ वरून ६७ झाला आहे. १०० हा स्कोअर सर्वाधिक मुक्त किंवा स्वातंत्र्य देणाऱ्या देशासाठी आहे. भारताचा क्रमांक २११ देशांमध्ये ८३ वरून घसरून ८८ व्या स्थानावर आला आहे.
राकेश सिन्हा यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत या अहवालाविषयी आपली भूमिका मांडली आहे. सिन्हा यांनी “हे साम्राज्यवादी षडयंत्र आहे. भौगोलिक साम्राज्यवाद संपला असला, तरी वैचारिक साम्राज्यवाद अजूनही तसाच आहे” असं म्हटलं आहे. “भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर लोक पूर्ण स्वातंत्र्यानिशी सरकारी धोरणांवर आणि न्यायव्यवस्थेवर टीका करू शकत आहेत. पण पश्चिमेकडील (अमेरिका) एक शक्ती भारताची स्वतःच्या नजरेतून मांडणी करत आहे. त्यामुळेच हा अहवाल पूर्णपणे भारतविरोधी कटाचा भाग आहे. त्यांची दृष्टी किती दूषित आहे, हे यातून दिसतं.
भारतात दररोज शेकडो टीव्ही चॅनेल स्वतंत्रपणे वादविवाद, चर्चा होते. वृत्तपत्रांवर कोणतंही नियंत्रण नाही. सोशल मीडियालाही पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मग हे स्वातंत्र्य नाही, तर आणखी काय आहे?” असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.