फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघतर्फे (इस्कॉन फैजपूर) गुरूवारी राम नवमी साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम झाले.
श्री रामनवमी, म्हणजेच प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. अयोध्या येथे हा महोत्सव अतिशय जल्लोषात, लाखो भक्तांच्या उपस्थित साजरा केला जातो. इस्कॉन फैजपूर मध्येही ‘जय श्रीराम’च्या जयघोषात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी महोत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम आहेत आणि सर्वांनी प्रभू रामचंद्रांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करून मनुष्य जीवन सफल करावे , असे प्रतिपादन श्रीमान माधव प्रभू यांनी केले. रामनवमी निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हरे कृष्ण महामंत्राच्या जयघोषात शहरवासीय उत्साहात सहभागी झाले. शोभा यात्रेत प्रभू रामदरबाराचा सजीव देखावा करण्यात आला होता.
रामनवमी निमित्त मंदिराची तसेच श्री गौर निताई विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली. महोत्सवाला पहाटे साडे चार वाजताच्या मंगल आरतीपासूनच सुरूवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती व श्रीमद भागवत प्रवचन झाले. प्रभू श्रीरामांचे गुणगान करणारे श्लोक स्तवन करण्यात आले. पुष्प अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. प्रसाद वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी माधवदास प्रभुजी , प्रवीण महाराज, त्रिवेणी बालगोपाल गोप भजनी मंडळ युवा वर्ग व महिला वर्ग आदींनी परिश्रम घेतले.