फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर ते पिंपरूड फाटा या सध्या अतिशय खडतर अवस्था असणार्या रस्त्याची दुरूस्ती सुरू करण्यात आली असून यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रयत्न केले आहेत.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील फैजपूर ते पिंपरूड फाटा ह्या रस्त्याची गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या रस्त्यावरून येजा करणा-या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना रस्ता खराब असल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. परंतु, या रस्त्याची दखल घेत फैजपूर येथील नगरसेवक देवेंद्र बेंडाळे वकेतन किरंगे यांनी काही दिवसांपुर्वी हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. याची दखल घेत आमदर चौधरी यांनी सर्वजनिक विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे व फोनवर संपर्क करून फैजपूर ते पिंपरूड फाटा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा अशा सूचना दिल्यात.
या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आलेली आहे. हा रस्ता दुरुस्त होत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहेत. तसेच, फैजपूर ते पिंपरूड फाटा रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाल्यामुळे फैजपूर येथील नगरसेवक देवेंद्र बेंडाळे व केतन किरंगे यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे आभार मानले आहेत.