फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील नगरपालिका संचालित म्युनिसिपल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एल. आगळे यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे रद्द केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, म्युनिसिपल हायस्कुलचे शिक्षक आर. एल. आगळे यांना तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी दि १७ ऑक्टोबर २०१६ च्या पत्रानुसार सेवा जेष्ठतानुसार मुख्याध्यापक पदाची कायम मान्यता दिली होती. यानंतर तब्बल ५ वर्षा नंतर त्यांची कायम मुख्याध्यापक पदाची मान्यता २१ जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांनी रद्द केली आहे.

या संदर्भात तत्कालीन मुख्याध्यापक किशोर तळेले यांनी शिक्षण उपसंचालक व वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे शाळेतील कारभारा विषयी तक्रारी केल्या होत्या त्याची दखल घेत आगळे यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.तसेच पालिका प्रशासनाने मुख्याध्यापक निवडी साठी नव्याने प्रक्रिया पूर्ण करून मुख्याध्यापक पदावर पात्र कर्मचार्यांची पदोन्नतीने नियुक्त करून तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवावा असे आदेशात म्हटले आहे. म्युनिसिपल हायस्कुलच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्दची घटना घडली आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या संदर्भात आर.एल. आगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,
सेवाज्येष्ठता नुसार मुख्याध्यापक पदावर माझाच दावा असून त्या नुसारच मुख्याध्यापक पदी माझी नियुक्ती करण्यात आली होती.वरिष्ठ अधिकार्यांकडे खोट्या व दिशाभूल तक्रारी करण्यात येऊन माझी मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.या निर्णया विरुद्ध मी न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहे.


