फैजपुरात रेशन दुकानदाराला धमकावून चमकोगिरी

फैजपूर, ता. यावल, निलेश पाटील । लॉकडाऊनच्या कालावधीत काही ठिकाणचे रेशन दुकानदार काळाबाजार करत असल्याचे उघडकीस येत असतांना याच्या अगदी उलट येथील एक स्वस्त धान्य दुकानदाराला धमकावून त्याच्याकडून मिळालेल्या धान्यावर मिरवून घेणार्‍या समाजसेवकाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मध्ये हातावर पोट असणार्‍यांची उपासमार होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. यात शहरात दोन दिवस आधी एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍याने रेशनिंग दुकानदाराला धमकावून त्यांच्याकडून पंधरा किलो तांदूळ घेऊन तो गरीब लोकांना वाटण्याचा प्रताप एका महाभागाने केला असल्याची माहीती महसूल मधील एका शासकीय कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

दोन दिवसापूर्वीच वाघोदा येथील एका रेशनिंग दुकानदाराचा व्हिडिओ लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. या दुकानदारावर कमी धान्य दिल्याने व जादा भावाने धान्य विक्री केल्याने गुन्हा दाखल करून परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. एकीकडे शासन रेशनिंग दुकानदारांवर कारवाई करीत आहे तर दुसरीकडे असे चमको सामाजिक कार्यकर्ते रेशनिंग दुकानदारांकडून दमदाटी करून एक पैसा न देता १५ किलो तांदूळ घेत आहेत. या महाशयाने गरिबांच्याच तोंडाचा घास हिसकावून तेच धान्य गरिबांना धान्य वाटप करून स्वतॅचा उदो-उदो करून घेत आहे. तथापि, तो तांदूळ पैसे न देता घेतलाच आहे हे तो विसरला असावा.

दरम्यान, एखाद्या वेळेस या रेशनिंग दुकानदारांची धान्य साठ्याची चौकशी झाली आणि त्यात धान्य कमी झाले तर या रेशनिंग दुकानदारांवर कारवाई होऊ शकते. म्हणून प्रशासनाने या रेशनिंग दुकानदारांची चौकशी करून त्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्या महाप्रतापावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहे. या सामाजिक संस्थेच्या कथित पदाधिकार्‍याबाबत शहरात चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content