नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया वेगात सुरू असून, त्याआधीच परदेशातून लस येण्याची चिन्हं आहेत. फायझरने भारतात लस विक्री व वितरणाची परवानगी मागितली आहे.
आठ-नऊ महिन्यांपासून देशातील नागरिक कोरोनाच्या दहशतीखाली जगताना दिसत आहे. देशातील रुग्णवाढ कमी झाली असली, तरी भीती अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येकाला आता प्रतीक्षा आहे ती कोरोना लसीची.
फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनन सरकारनं फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्याचबरोबर बहारिनमध्येही लस वापरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे.
लसीची आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केलेल्या अर्जात मागितली आहे. नवीन औषधी व क्लिनिकल चाचणी नियम २०१९ नियमांतंर्गत सध्या सुरू असलेल्या चाचण्यामधून सूट देऊन अशा प्रकारची परवानगी देण्याची विशेष तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फायझर इंडियाने ४ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. या लसीचा भारतात आपातकालीन स्थितीत वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे फायझरने केल्याचे सूत्रांनी सांगितले.
जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते.