पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील तरुणाकडून पैसे घेऊन विवाह केलेली मध्य प्रदेशमधील तरुणी विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्रीतून पसार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फरार नववधू तिच्या तीन साथीदारांना पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची हकीकत अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर ) येथील चेतन विलास चौधरी (रा. संजय नगर पिंपळगाव (हरेश्वर)) याचा विवाह मध्यप्रदेशातील मोहमांडळी ता. जि. खरगोन (मध्यप्रदेश) येथील कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे यांचे सुरेश उर्फ मिस्त्रीलाल सुलभा आर्य रा. सोनवद जि. बडवानी, हापसिंग उर्फ आपसिंग शिकाऱ्या पावरा रा. हैद्रयापाडा ता. शिरपूर जि. धुळे व अनिल विश्राम धास्ट रा. मोहमांडळी ता. जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांचे मध्यस्थीने १ लाख २६ हजार रुपये घेऊन दि. ३ मे २०२२ रोजी झाला होता. दरम्यान विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी वधू कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे ही आपल्या शिरपूर येथील साथीदारासोबत रात्री दोन वाजता पसार झाली. याप्रकरणी चेतन चौधरी याने दि. ६ मे रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात खरगोन (मध्यप्रदेश) व शिरपूर (धुळे) येथून नवविवाहितेसह तिच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. माहिती जाणून घेण्यासाठी पाचोरा न्यायालयातून सात दिवसाची पोलिस कोठडी मिळविली आहे. याबात सदर युवती व तीच्या साथीदारांनी लग्नाचे आमिष दाखवून अनेक जणांची फसवणूक केली असल्याचा संशय पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
अशी सापडले चौघे पोलिसांच्या जाळ्यात
पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस नाईक रविंद्रसिंग पाटील, पोलिस काॅन्स्टेबल पंकज सोनवणे, मनोज बडगुजर, महिला पोलिस काॅन्स्टेबल योगिता चौधरी या पथकाची स्थापना केली. या पथक दि. १७ मे रोजी मध्यप्रदेशातील सोनवद ता. सेंधवा जि. बडवानी येथे जावून सुरेश उर्फ मिस्त्रीलाल सुलभा आर्य यास ताब्यात घेऊन मोहमांडळी गाठले. यावेळी कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे ही घरीच आढळून आल्याने तीस पोलिसी खाक्या दाखविताच तीने रोख १ लाख २६ हजार, १० हजार रुपये असे १ लाख ३२ हजार रोख, व १० हजार रुपये किंमतीचे सोने चांदिचे दागिने काढून दिले. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस पथकाने वधू व तिच्या तीन साथीदारांना दि. १९ मे रोजी पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे आणल्यानंतर पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पिंपळगाव (हरेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.