महाराजगंज: (उत्तर प्रदेश ) : वृत्तसंस्था । हाथरस बलात्कारानंतर महाराजगंजमध्येही अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बॉयफ्रेंडसह अन्य तीन मित्रांनी तिच्यावर शेतात नेऊन बलात्कार केला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य तिघा मित्रांचा शोध सुरू आहे.
महाराजगंजमधील कोठीभार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. नंतर आरोपी तेथून पसार झाले. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चारही आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा अल्पवयीन मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश नावाच्या तरुणाने फोन करून पीडितेला शेतात बोलावले. तिथे आधीच तिघे मित्र होते. सतीश आणि त्या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
संध्याकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी ती शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला सिसवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. शेजारी गावातील सतीशने मुलीला फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी तिथे गेल्यानंतर सतीश आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाबाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
महाराजगंज पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात बलात्काराचा आणि पॉक्सो कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.