जामीन होत नसल्याने कारागृहातील कैद्याचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात गेल्या दीडवर्षांपासून जिल्हा कारागृहात असलेल्या एका कैद्याने जामीन होत नाही म्हणून फिनाईल पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. कैद्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दीड वर्षापासून खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात
कारागृह रक्षक विक्रम मोतीराम हिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार असे की, येथील जिल्हा कारागृहामध्ये सूंतीलाल उर्फ शांताराम बाबूलाल पावरा (वय -३८ ) रा. हा कैदी १ एप्रिल २०१९ पासून कारागृहात दाखल झाला होता. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. तो कारागृहातील स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक बनवण्याचे काम करतो. हिवरकर हे ४ रोजी पाकगृह अंमलदार रक्षक म्हणून कर्तव्यवर असताना 4 ऑक्टोबर रोजी सूंतीलाल उर्फ शांताराम पावरा कैदी कारागृहातील नियमानुसार त्याचा मेव्हणा राजू सखाराम पावरा यांच्याशी फोनवर 9.42 वाजता सुमारे 3 मिनिट 36 सेकंद बोलला. यानंतर त्याला उलट्या व चक्कर यायला लागल्याने इतर सहकार्याच्या मदतीने त्याला करागृहातच प्राथमिक उपचार देण्यात आले. काय होतय अस विचारताच कैदी सुंतीलाल याने कारागृहातील स्वयंपाक घरात साफसफाईसाठी असलेले फिनाईल पिल्याची माहिती रक्षक हिवरकर यांच्याशी बोलतांना दिली. कारागृह रक्षक विक्रम हिवरकर, दत्ता खोत, अमित पाडवी, सीताराम हिवारे यांच्यासह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानुसार रक्षक विक्रम हिवरकर यांच्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार करीत आहेत.

ऑडीओ रेकॉर्डिंग तपासली
कैदी सुंतीलाल पावरा याने लावलेल्या फोनवरील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासली असता असे लक्षात आले की, कैदी सुंतीलाल याने मेव्हण्यास माझ्या घरचा नंबर द्या, त्यावेळी मेहुणाने घरचा नंबर नाही म्हटल्यावर सुंतीलाल पावराने मेहुण्यास सांगितले कि, मी मरून जाऊ का, वकील लावा, माझा लवकर जामीन करा. त्यावर मेहुणा राजू पावरा याने लॉकडाऊन असल्याने मालक पैसे देत नाही, त्यामुळे पैसे नसल्याने वकील कुठून लावू , त्यावर कैदी सुंतीलालने, माझ्या बाईचे अंगावरील दागिने विका, वकील लावा व जामीन करा असे सांगितल्याचे समजले. या फोननंतर काही वेळातच कैदी सुंतीलाल याने फिनाईल प्राशनने हा प्रकार समोर आला.

Protected Content