नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखीही काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी काँग्रेस नेते राष्ट्रपती भवनाकडे निघाले होते. मात्र काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू करून पोलिसांनी त्यांना रोखलं. याबद्दल प्रियंका यांनी संताप व्यक्त केला. कृषी कायद्यांविरोधात गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप नेते आणि भाजपचे समर्थक देशद्रोही म्हणतात. यापेक्षा मोठं पाप असू शकत नाही, अशा शब्दांत प्रियंका यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. मात्र लोकनियुक्त खासदारांना अडवलं जात आहे. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. यात नेमकी समस्या काय? दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार त्यांचा आवाज ऐकण्यास तयार नाही,’ अशा शब्दांत प्रियंका यांनी सरकारवर जोरदार टीका केली.