प्रितम मुंडेंना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज नसल्याचे भाजपाचे स्पष्टीकरण

 

मुंबई : वृत्तसंस्था । प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने त्या आणि पंकजा मुंडे नाराज नसल्याचे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून बुधवारी ४३ जणांनी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळात ३६ नवे चेहरे सहभागी झाले आहेत तर दुसरीकडे चार महत्वाच्या पदावरील मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. दरम्यान महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली. दरम्यान प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला बळ मिळालं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत असला तरी केवळ वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही पक्षात इतरांनाही संधी मिळते हा संदेश दिला जात असल्याचं मानले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी केंद्रातील किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याचं अभिनंदन केलं नसून त्या नाराज असल्याची चर्चा असल्याचं प्रवीण दरेकर यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल”.

प्रीतम मुंडे यांचादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा बुधवारी सुरू होती. काही प्रसारमाध्यमांनी प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याचंही वृत्त दिलं होतं. महाराष्ट्रातील इतर काही इच्छुक नेत्यांसोबतच खासदार प्रीतम मुंडे देखील दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं होतं.

“खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत”, असं पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

बीड जिल्ह्यतील भाजपाचे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा सहा वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आणि आठच दिवसात अपघाती निधन झाले. त्यांचा राजकीय वारस मुलगी पंकजा मुंडे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री तर दुसरी मुलगी डॉ. प्रीतम मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन खासदार केले. डॉ.प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असा दावा समर्थकांकडून केला जात होता. मात्र पक्षाने वर्षभरापूर्वी राज्यसभेवर घेतलेल्या वंजारी समाजातील डॉ.भागवत कराड यांची वर्णी लावली. यामुळे पुन्हा एकदा पक्षाने मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समाज माध्यमातून समर्थकांनी लावला आहे. मात्र,पक्षाने केवळ वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही समाजातील इतरांनाही संधी दिली जाते हा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर मेळावा घेऊन प्रदेश नेतृत्वाविरुध्द अप्रत्यक्ष बंडच पुकारले होते. परिणामी विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न करुनही त्यांच्याऐवजी लातूरचे वंजारी समाजातील रमेश कराड यांना आमदार केले. तर भागवत कराड यांनाही पक्षाने थेट राज्यसभेवर घेऊन पक्षात मुंडे भगिनींच्या शिफारशीशिवायही निर्णय होऊ शकतात हा संदेश दिला होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपबरोबर जोडलेला वंजारी व इतर ओबीसी समाज पक्षाबरोबर रहावा यासाठी भाजप नेतृत्वाने डॉ.कराड यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.कराड हे बीड जिल्ह्यच्या सरहद्दीवर असलेल्या चिखली या गावचे असून ते औरंगाबादला स्थायिक आहेत. दिवंगत मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांना काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.

 

Protected Content