प्रामाणीकपणा : दोन लाखांचा सोन्याचा हार केला परत

भडगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील गोंडगाव येथिल समाधान निकम यांनी त्यांना सापडलेला  सुमारे २ लाखांचा नेकलेस प्रामाणिकपणे परत केला. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करून त्यांचे अभिंनदन करण्यात येत आहे.

 

समाधान निकम हे गोंडगाव येथुन जवळच असलेले घुसर्डी ता. भडगाव येथील भीमराव पाटील यांच्या मातोश्रीच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मित्र हिरामण कोळी सह गेले होते. यावेळी तालुक्यातूनही अंत्यविधीसाठी जनसमुदाय मोठ्याप्रमाणात जमलेला होता. समाधान साहेबराव निकम यांनी आपली मोटरसायकल उभी केली असता त्यांना मोटरसायकलीच्या काही अंतरावर नेकलेस दिसला.  त्यांनी हातात घेऊन पाहिल्यानंतर लक्षात आले की, हा सोन्याचा नेकलेस आहे.  त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, कोणत्याही लोभाला बळी न पडता अंत्ययात्रेत सहभागी भजनी मंडळाच्या माईकवरुन सोन्याचा नेकलेस सापडला आहे, ज्याचा असेल त्यांनी घेऊन जावे अशी घोषणा केली. सदरचा नेकलेस संभाजीनगर येथिल रहावाशी तथा घुसडी येथील माहेरवाशीन असलेल्या एका महिलेचा होता.  सुमारे दोन लाख रुपयाचा कींमतीचा नेकलेस परत करत प्रामाणिकपणाचा प्रत्यय समाधान निकम यांनी दिला.

व्यापाऱ्यांकडून समाधान निकम यांचा सत्कार व बक्षीस 

दुसऱ्या दिवशी घुसर्डी येथील शिंदे परिवाराकडून समाधान निकम यांचा सत्कार करुन बक्षीस म्हणून दोन हजार रुपये देऊ करण्यात आले. समाधान निकम यांनी सदर बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला, परंतु ग्रामस्थांच्या आग्रहाखातर समाधान निकम यांनी रक्कम स्विकारुन आपल्या गावातील श्री संत सेना महाराज मंदिर कार्यात खर्च करणार असल्याचे जाहीर केले. त्यांचा या निरपेक्ष व प्रामाणिकपणाचा गौरव गोंडगाव ग्रामस्थाच्यावतीने सत्कार करुन करण्यात आला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

आई, वडीलाच्या संस्कारामुळे लालसा निर्माण झाली नाही – समाधान निकम 

सुमारे दोन लाखाचा सोन्याचा नेकलेस परत केल्याने माझ्या प्रामाणिकपणा विषयी परीसरातील मान्यवर व्यक्तीनी माझा सत्कार केला. अनेक जणानी भ्रमणध्वनी वरुन माझे कौतुक करुन अभिनंदनचा वर्षाव केला आहे. यामुळे माझी तहान, भुक हरवली आहे. माझ्या आई, वडील यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळे माझ्या मनात कोणतीही लालसा निर्माण न होता  हे प्रामाणिकपणाचे कार्य माझ्या हातुन घडले. मी परमेश्वराचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया समाधान निकम यांनी लाईव्ह ट्रेडशी बोलताना दिली.

Protected Content