नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला कठोर संदेश दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सर्व सदस्य देशांना परस्परांच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचा सल्ला दिला.
“शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांसोबत भारताचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आहेत. पुढे जाताना आपण परस्परांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “द्विपक्षीय मुद्दे SCO च्या अजेंडयावर आणण्याचा अनावश्यक प्रयत्न केला जातो. हे दुर्देवी आहे. SCO च्या नियमांचे हे उल्लंघन आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या व्हर्च्युअल परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमने-सामने आले.
मे महिन्यापासून पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. लडाख सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचा सल्ला दिला. कोरोना संकटामुळे यंदा शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली आहे. दहशतवादाचा वाढता धोका आणि कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम या मुद्यांवर प्रामुख्याने बैठकीत चर्चा होईल.