प्रवासी महिलेच्या पर्समधील ३० हजारांचे दागिने व रोकड लांबविले

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर बसस्थानकाच्या आवारात अंबरनाथ येथील प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली पाकीट चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी १७ मे रोजी सकाळी १० वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका संशयीत तरुणीला ताब्यात घेतले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या मनीषा नरेंद्र सुरवाडे (वय-२९) या महिला आपल्या कामाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात आलेल्या होत्या. १७ मे  रोजी सकाळी १० वाजता त्या जामनेर बसस्थानक आवारात आल्या होत्या. त्यांच्याजवळ असलेल्या एका पर्समधील पाकिटात त्यांनी सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि सात हजार रुपये रोख असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ठेवलेला होता. जामनेर बसस्थानकाच्या आवारात असताना त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम ठेवलेले पाकीट अज्ञात चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जामनेर पोलिसांनी एका संशयित तरूणीला चोरी केल्याच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बिऱ्हाडे करीत आहे.

Protected Content