जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात प्रवाश्यांना रिक्षात बसवण्याच्या कारणावरून दोन रिक्षा चालकांमध्ये शिवीगाळ करून हाणामारी झाल्याची घटना गुरूवार २२ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही रिक्षा चालकांवर परस्पर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवाशी रिक्षांचा थांबा आहे. गुरूवार २२ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे प्रवाशी रिक्षात बसवल्याच्या कारणावरून रिक्षा चालकांमधील दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तसेच एकमेकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. याप्रकरणी रात्री ९ वाजता मुजीत अन्सारी समशोद्दिन अन्सारी (वय-१८) रा. बिलाल चौक, तांबापूरा,जळगाव याने दिलेल्या तक्रारीवरून रिक्षा चालक पप्पू (पुर्ण नाव माहित नाही), देवीदास कोळी आणि इतर सोबत अनोळखी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या तक्रारीत रिक्षा चालक देवीदास सोमनाथ कोळी (वय-६३) रा.शिवाजी नगर हुडको , जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हैदर अली उर्फ मुन्ना, इरशाद अली रा. तांबापूरा, आणि इतर अनोळखी दोन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तक्रारींचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.