मुंबई, वृत्तसेवा । प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने क्रिकेटचा चालता-बोलता इतिहास हरपल्याच्या भावना अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या आहेत.
वसंत रायजी यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील निवासस्थानी शनिवारी मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी त्यांचे निधन झाले, अशी माहिती वसंत रायजी यांचे जावई सुदर्शन नानावटी यांनी दिली. वसंत रायजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि जावई असा परिवार आहे. दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत आज (शनिवारी) दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला. रायजी यांनी १९४० च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी रचलेल्या २७७ धावांमध्ये ६८ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. नागपूर येथे ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ संघातून त्यांनी पदार्पण केले. तर विजय मर्चंट यांच्या नेतृत्वात १९४१ मध्ये पश्चिम भारत संघ खेळला, तेव्हा रायजी यांचे मुंबई पदार्पण झाले.