नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे. तसेच हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे आपल्या आदेशात म्हणाले की, प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीचं असते. मुलीला १९५६ च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. पण २००५ सालात केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात २००५ सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आता मुली हक्काने आपला वाटा मागू शकणार आहेत. दरम्या, आपल्या पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे २००५ मध्ये अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.