नवी दिल्ली वृत्तसंस्था-प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेनं नुकतंच २३० विशेष रेल्वेसोबतच आणखीन ८० रेल्वे चालवण्याची घोषणा केलीय. याचसोबत प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये, त्यांना वेटिंग तिकिटाच्या समस्येला तोंड द्यावं लागू नये, याचीही काळजी रेल्वे प्रशासनाकडून घेतली जातेय. यासाठीच रेल्वेकडून ‘क्लोन रेल्वे’ योजना सुरू करण्यात येतेय.
क्लोन रेल्वे योजनेद्वारे नागरिकांना वेटिंग तिकीट मिळाल्यानंतरही आसन उपलब्ध होऊ शकेल. दीड-एक महिन्याच्या लांबलचक वेटिंग लिस्टच्या समस्येपासून नागरिकांच्या सुटकेसाठी रेल्वेनं क्लोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय. येत्या १२ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणाऱ्या अधिकच्या ८० विशेष रेल्वेसोबतच क्लोन रेल्वेचीही घोषणा करण्यात आली.
‘क्लोन रेल्वे’ योजनेत रेल्वे प्रशासनाकडून ज्या रेल्वेमध्ये जास्त वेटिंग लिस्ट असेल अर्थात ज्या मार्गावर प्रवाशांकडून प्रवासाची मागणी वाढलेली दिसेल त्या मार्गावर या ‘क्लोन रेल्वे’ चालवण्यात येतील. गरजेनुसार वेटिंग लिस्ट असलेल्या रेल्वेनंतर त्याच मार्गावर त्याच क्रमांकाची आणखी एक रेल्वे चालवण्यात येईल. या क्लोन रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना कन्फर्म सीट मिळू शकेल .. या दोन्ही रेल्वे एकाच प्लॅटफॉर्मवरून निघतील. नाव आणि क्रमांक एकच असल्यानं या रेल्वेला ‘क्लोन रेल्वे’ म्हटलं गेलंय.