नवी दिल्ली: वृत्तसंस्था । आतापर्यंत केवळ महान व्यक्ती आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचेच फोटो टपाल तिकीटावर छापण्याची प्रथा होती. आता तुम्ही स्वत:चा , लग्नाच्या वाढदिवसाला पती-पत्नीचा फोटो किंवा तुमच्या कुटुंबाचा फोटोही टपाल तिकीटावर ३०० रुपयात छापू शकता.
भारतीय टपालच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सरकारची जुनी योजनाच आहे. मात्र, अनेक लोकांना त्याविषयी माहिती नव्हती. या योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही टपाल तिकीटावर स्वत:चा फोटो छापू शकते. ‘माय स्टॅम्प’ असे या योजनेचे नाव आहे.
‘माय स्टॅम्प’ योजनेतंर्गत टपाल तिकीटावर तुमचा फोटो छापण्यासाठी केवळ ३०० रुपये इतका खर्च येईल. यामध्ये तुम्हाला १२ टपाल तिकीटे मिळतील. इतर टपाल तिकीटांप्रमाणे ही तिकीटे तुम्ही व्यवहारासाठीही वापरु शकता.
टपाल तिकीटावर स्वत:चा फोटो छापण्यासाठी तुम्हाला किमान १ शीट (१२ तिकीटे) विकत घ्यावी लागतील. ५००० शीट खरेदी केल्यास २० टक्के डिस्काऊंटही मिळेल. ५००० शीटची किंमत प्रतिशीट ३०० रुपयाप्रमाणे 15 लाख होते. २० टक्के सूट असल्याने १२ लाख रुपयेच भरावे लागतील.
या योजनेतंर्गत फोटो छापण्यासाठी संबंधित व्यक्ती जिवंत असणे गरजेचे आहे.