जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सोनारी गावातील दोन समाजातील दहा ते बारा जणांमध्ये जामनेर पोलीस ठाण्याच्या आवारातच तुफाण हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. पोलीसांनी दोन्ही गटातील वाद हा मध्यस्थी सोडविल्याने पुढील अनर्थ टळला. जखमी झालेल्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील सोनारी गावातील पारधी समाजाचे व बेलदार समाजाचे काही नागरिक मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी गावातील चौकामध्ये बसलेले होते. यावेळी एकमेकांशी बोलण्यावरून वाद निर्माण झाला. वादातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यासंदर्भात सर्वजण जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते. दरम्यान दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी जामनेर पोलीसांसह काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. त्यानंतर दोन्ही गट गावात गेल्यानंतर त्यांच्या पुन्हा वाद होवून तुफान हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाले. पुन्हा दोन्ही गटाचे लोक जामनेर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीसांसमोर एकमेकांमध्ये भिडले व मारहाण करण्यास सुरूवात केली. या हाणामारीत सात जण गंभीर जखमी झाले. यावेळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींना जामनेर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतेही प्रकारची तक्रार याबाबत दाखल झालेली नव्हती