मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रात्री उशीरा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी या हल्ल्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जबाबदार धरले आहे.
काल दिवसभर राणा दाम्पत्यामुळे खळबळ उडाली. यानंतर रात्री किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. सोमय्या हे काल खार पोलिस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला भेटायला गेले होते. यावेळी त्यांच्यावर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली. या हल्ल्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. आज पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, मी पोलिस ठाण्यात जाणार याची माहिती पोलिसांनी याआधीच शिवसैनिकांना देण्यात आली होती. ठाकरे सरकारकडून माझ्यावर हल्ल्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सोमय्या पुढे म्हणाले, शिवसेनेच्या ७०-८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, पोलिसांनी त्यांना संरक्षण होतं. माझा जीव घेण्याचा प्रयत्न खार पोलिसांच्या मदतीने शिवसेनेच्या गुंडांनी केला. मला थोडी जखम झाली, हा दगड जर का मला चार इंचावरती लागला असता तर मी आंधळा झालो असतो, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, हा हल्ला ठाकरे पुरस्कृत होता. मी येणार हे माहिती असल्याने आधीपासूनच पोलिस स्टेशनमध्ये ७०-८० शिवसैनिकांनी एकत्र येण्याची तयारी केली होती. त्यांनी मला शिवीगाळ केला. मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला दुखापत झाली. पोलिसांनी या शिवसैनिकांच्या हवाली माझ्या गाड्या करण्याचं काम केलं. पोलिसांच्या दारात कसे काय एवढे गुंड राहू शकतात, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.