पैसे पडल्याचे सांगून दुचाकीवरील सव्वा दोन लाखांची रोकडची पिशवी लांबविली

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाबा तुमचे पैसे पडले, असे सांगून वृध्दाच्या दुचाकीला लावलेली २ लाख १६ हजार रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाकर धर्मा लुटे (वय-५९) रा. राजुर ता. बोदवड हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. १ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते बोदवड शहराजवळील खंडेलवाल गॅस एजन्सी जवळून दुचाकीने जात असताना रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात तीन भामट्यांनी त्यांना सांगितले की, बाबा तुमचे पैसे पडले आहे, असे सांगितल्याने प्रभाकर लुटे हे थांबले. त्यांच्या मागून अज्ञात दोन व्यक्ती यांनी प्रभाकर यांची नजर चुकवून त्यांच्या दुचाकीला लावलेली २ लाख १६ हजार रुपये ठेवलेली पिशवी लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर प्रभाकर लुटे यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत तिघो रोकड घेवून पसार झाले होते. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी तातडीने बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ३ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद तायडे करीत आहे.

Protected Content