चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र डीवायएसपी विजय चौधरी यांनी वाशिम येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पाच लाखांच्या कुस्तीत विजय संपादन केला आहे.
क्षणार्धात चारली धुळ
हिंदुहृदयसम्राट पक्षप्रमुख बालासाहेब ठाकरे यांची जयंती नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या वाढदिवसानिमित वाशिम येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत विरुध्द जॉर्जीया अशी रंगणार होती. परंतू, हवामानामुळे विमान उड्डाण घेवून न शकल्याने जॉर्जीयावरुन येणारा पैलवान पोहचू शकला नाही. त्यामुळे पाच लाखांचे पारितोषीक असलेली पहिल्या क्रमांकाची लढत डिवायएसपी विजय चौधरी विरुध्द हरीयाणा येथील पैलवान विजयकुमार यांच्यात झाली. यात विजय चौधरी यांनी प्रतिस्पर्धी पैलवानाला क्षणार्धात धूळ चारुन पहिल्या बक्षिसाचा मान मिळविला.
अशा रंगल्या अन्य लढती
बाला रफिक शेख याने हरियाणाच्या सुशिलकुमार याला धुळ चारत चार लाखांचे बक्षिस पटकाविले.तीन लाख रुपये पारितोषीक असलेल्या तिसर्या क्रमांकाच्या लढतीत माऊली जमदाडे कोल्हापुर याने सौरभसिंग हरीयाणा याला नमविले. चौथ्या क्रमाकांच्या लढतीत शेख सिकंदर यांनी रैहान खान याला लोळवून दोन लाखांचे बक्षिस पटकाविले. एक लाख रुपये पारितोषीक असलेल्या पाचव्या क्रमांकाच्या लढतीत संग्राम पाटील यांना पराजित करुन परमिंदकुमार याने विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाची लढत बरोबरीत सुटल्याने हे बक्षिस विभागून देण्यात आले.
या स्पर्धेत पंचविस लाख रुपयांच्या बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, आ. विनायक मेटे, डिवायएसपी पवन बन्सोड आदी मान्यवर उपस्थित होते.