
गुवाहाटी (वृत्तसंस्था) बँक खाते, पॅन कार्ड आणि जमिनीच्या कागदपत्रांनी नागरिकता सिद्ध होऊ शकत नाही, असा निकाल गुवाहाटी हायकोर्टाने दिला आहे. विदेशी न्यायाधिकरणाच्या निर्णया विरोधात एका महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी दरम्यान, यादीत नाव न आल्यामुळे जुबेदा बेगम उर्फ जुबेदा खातून या महिलेने विदेशी न्यायाधिकरणात दाद मागितली. परंतू खातून या विदेशी असल्याचे न्यायाधिकरणाने घोषित केले. याविरोधात जुबेदा खातून यांनी हायकोर्टात याचिका केली. या महिलेने आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी गावातील सरपंचाच्या प्रमाणपत्रासह १४ कागदपत्र न्यायाधिकरणाला सादर केली. पण या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर ‘पॅन कार्ड किंवा बँक खाते नागरिकताचे प्रमाण असू शकत नाही. तसेच जमिनीचा सातबाराही नागरिकता सिद्ध करू शकत नाही. यामुळे न्यायाधिकरणाचा निर्णय योग्य आहे’, असा निर्णय हायकोर्टाने दिला.