पूजा चव्हाण आत्महत्या ; बंजारा समाज आक्रमक , परळीत गुप्त बैठक

 

बीड: वृत्तसंस्था । पूजा चव्हाण  आत्महत्येनंतर बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक झाला आहे. परळीतील गुप्त ठिकाणी बंजारा समाजातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोजकेच समाजबांधव उपस्थित आहेत.

 

या बैठकीनंतर बंजारा समाज संजय राठोड यांच्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बंजारा समाजाने प्रतिकूल भूमिका घेतल्यास संजय राठोड यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होऊ शकते.

 

आज सकाळीच बंजारा समाजाचे नेते मनीष जाधव यांनी पूजाला न्याय मिळवून द्यायची मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते आणि विमुक्त घुमंतू जनजाती महासभा प्रदेशाध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले होते.

 

कर्तृत्वसंपन्न समजल्या जाणाऱ्या बड्या मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. भालचंद्र नेमाडे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले, त्यावेळी समाजाने एकजूट दाखवत आंदोलन केले. त्याप्रमाणेच आताही समाजानं एकजूट दाखवण्याची गरज आहे. कोणतेही राजकीय हेवेदावे न दाखविता न्यायासाठी समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, अशी अपेक्षा मनीष जाधव यांनी व्यक्त केली होती.

 

पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.  ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

Protected Content