नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पुदुच्चेरीमधल्या अजून एका आमदाराने राजीनामा दिल्यामुळे आता काँग्रेसचं सरकार अल्पमतात आलं असून विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपकडून अपेक्षेप्रमाणे फ्लोअर टेस्ट अर्थात बहुमत चाचणीची मागणी केली गेली आहे.
देशात उण्यापुऱ्या ५ राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांपुढे भाजपकडून वेळोवेळी आव्हानं उभी केली गेली आहेत. आता देखील काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला असून पुदुच्चेरीमधील काँग्रेसचं सरकार पडण्याच्या स्थितीवर येऊन ठेपलं आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या पुदुच्चेरी दौऱ्याच्या आधीच अशा प्रकारे काँग्रेससमोर राजकीय पेच निर्माण झाल्यामुळे आता राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीचं सरकार आहे. आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले असून आता ए जॉन कुमार यांनी देखील विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. सिवकोलुंथू यांच्याकडे सभागृह सदस्यपदाचा राजीनामा सोपवला आहे. याआधी ए. नामासिवायम आणि मल्लाडी कृष्ण राव हे दोन मंत्री आणि ई थीप्पैथन या आमदाराने राजीनामा दिला आहे. एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कारवायांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३३ आमदारांच्या पुदुच्चेरी विधानसभेमध्ये आता काँग्रेस-द्रमुक आघाडीचे १४ तर भाजप-अद्रमुक आघाडीचे देखील १४ आमदार राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या १४ आमदारांमध्ये १० काँग्रेस, ३ द्रमुक आणि १ अपक्ष आमदाराचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजप-अद्रमुक आघाडीमध्ये ३ भाजप, ७ एनआर काँग्रेस आणि ४ अद्रमुकचे आमदार आहेत.
पुदुच्चेरीचे आरोग्यमंत्री मल्लाडी कृष्णा राव यांनी राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ २४ तासांमध्येच कुमार यांनी देखील राजीनामा दिला आहे. कुमार हे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या जवळचे मानले जात होते. विशेष म्हणजे २०१६मध्ये त्यांनी जिंकलेली जागा त्यांनी नारायणसामी यांच्यासाठी सोडली देखील होती. मात्र, नुकत्याच त्यांच्या दिल्लीमध्ये काही भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकांनंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली. अखेर आज त्यांनी राजीनामा सादर केला आहे. याआधीच ए. नामासिवायम आणि ई थीप्पैथन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
येत्या मे महिन्यामध्ये पुदुच्चेरीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राजीनाम्यांचा, त्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या पुदुच्चेरी भेटीचा काय परिणाम या निवडणुकांवर होईल, याविषयी राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.