पुण्यात बार, हॉटेल, रेस्तराँसह पीएमपीएल बससेवा सात दिवसांसाठी बंद

 

 

 

पुणे : वृत्तसंस्था । पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू आहे . पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे.

 

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.  पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस बाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.

 

अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे.  सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

याशिवाय आयुक्त सौरभ राव म्हणाले, दररोज आढळणारी  बाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे  आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत.  रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल.

 

ग्रामीण भागात सध्या ज्या ठिकाणी व्हेटिंलेटर्स वापरात नाहीत, ते हळूहळू शहरी भागात हलवले जात आहेत. याचं कारण म्हणजे शहरी भागांमधील रूग्णालयात मोठ्यासंख्येत  ग्रामीण भागातूनही रूग्ण दाखल होत आहेत.   अन्य जिल्ह्यांमधून देखील रूग्ण आता पुण्यात दाखल होत आहेत.

 

Protected Content