पुणे (वृत्तसंस्था) पुढील 24 तासात राज्यात मान्सून दाखल होणार आहे. तर 11 जून रोजी त्याचा वेग आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यामध्ये दहा तारखेला म्हणजे उद्या मान्सूनचे आगमन होईल. तसेच पुढील पाच दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 12 जून रोजी पुण्यात आणि 13 जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होईल. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यात 11 जूनपासून मान्सूनचा वेग वाढेल. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण, गोव्यात 11 जूनपासून पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस पडेल. अकरा तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.