जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्हा बँकेने २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात वितरीत केलेल्या पीककर्ज रकमेपैकी ४५० कोटी रुपये तसेच थकीत २०० कोटी असे ६५० कोटी रुपयांची वसुली केली आहे. यात १६० विविध विकास कार्यकारी सोसायट्यांनी १०० टक्के पीककर्ज वसुली झाली आहे. गेल्यावर्षी ४२२ कोटीची कृषी कर्जवसुली करण्यात आली होती.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे तसेच गेल्या तीन खरीप हंगामात पूर, अतिपावसामुळे वा रब्बी हंगामात बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन असलेल्या कपाशी तसेच अन्य शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहता सरासरी केवळ ५५ ते ६० टक्केच उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी २०२१-२२ च्या आर्थिक वर्ष मार्च अखेर नियमित तसेच थकीत पीककर्जाची परतफेड केली आहे.
जिल्हा बँकेकडून २०२१-२२ अंतर्गत विकासोच्या ८७७ संस्था आहेत. त्यातील शेतकरी सभासदांना १५ एप्रिल २०२१ नंतर खरीप व रब्बी हंगामासाठी ६५० कोटीपेक्षा अधिक पीककर्ज वितरीत करण्यात आले होते, त्यापैकी आर्थिक वर्ष मार्च अखेर जिल्ह्यातील ८७७ पैकी १६० विकास कार्यकारी सोसायटीच्या एक लाख पेक्षा अधिक शेतकरी सभासदांनी ४५० कोटी रुपयांची कर्जफेड केली आहे. तर थकीत असलेल्या २० हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी २०० कोटीची अशी एकूण ६५० कोटी रुपये कृषी कर्जफेड केली आहे.
बँकेच्या अध्यक्षांसह अधिकारी, कर्मचाऱ्याच्या आवाहनाला प्रतिसाद
जिल्हा बँकेत नव्यानेच निवडून आलेल्या अध्यक्ष गुलाबराव देवकर, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांचेसह अधिकारी कर्मचारी यांनी मार्च अखेर ५५० कोटीचे थकीत कृषी कर्ज वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार बँकेच्या अध्यक्षांसह अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक तालुकानिहाय विकासोचे गटसचिव यांच्या बैठक घेत शेतकऱ्यांना थकीत पीककर्ज परतफेडीचे आवाहन करण्यात आले. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे आणि बँकेच्या अधिकारी कर्मचारी यंत्रणाच्या मार्गदर्शनामुळे यावर्षी ६५० कोटीची कर्जवसुली करण्यात आली.